औरंगाबाद : लातूर शहर व परिसराचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. आगामी काळात कायमस्वरूपी यातून मार्ग काढण्यासाठी जायकवाडी, उजनी, माजलगाव या पाणी प्रकल्पांतून जलवाहिनी टाकण्याचा प्राथमिक प्रस्ताव विभागीय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.मातोळा येथून लातूर परिसरातील १० खेड्यांसाठी ८३ लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. उस्मानाबाद व परिसरासाठी १६ एमएलडी पाणी लागणार असून उस्मानाबाद नगर परिषदेने उजनीतून येणारे सर्व पाणी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लातूरसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रस्तावित केलेल्या ५६ कोटी रुपयांच्या दोन्ही योजना शासनाकडे प्रलंबित आहेत. उजनी, माजलगाव, जायकवाडी यापैकी ज्या प्रकल्पातून पाणी उचलणे सोयीस्कर ठरेल तेथून योजना कार्यान्वित करण्याचा विचार सुरू आहे. नैसर्गिकदृष्ट्या किफायतशीर योजनेवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.
लातूरला पाणी; ८00 कोटी हवे
By admin | Published: March 22, 2016 4:05 AM