निलंगा/निटूर (जि. लातूर) : बीडमध्ये नरबळी दिल्याची घटना ताजी असतानाच अमावस्येच्या रात्री माचरट वाडीच्या एका शेतात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न फसला. गावकऱ्यांनी तक्रार देताच पोलीस घटनास्थळी धडकले. मात्र म्हसोबाची पूजा असल्याचे सांगत प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांनी मात्र या आरोपाचा इन्कार करीत तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे़ माचरट वाडीच्या एका व्यक्तीला गावातीलच अनिल कुलकर्णी यांच्या शेतात गुप्तधन असल्याची स्वप्नेपडू लागली. याबाबत त्यांनी शिवाजीला सांगितले. त्याने या स्वप्नाबाबतची माहिती एका मांत्रिक बाईला दिली़ त्या बार्इंनी पुण्यातील दोघांना घेऊन ऐन अमावस्येच्या दिवशी २७ जून रोजी गुप्तधन शोधण्याची मोहीम हाती घेतली. साडेसातच्या सुमाराला दोन ड्रायव्हर आणि अन्य १६ जणांचा चमू सात वर्षांच्या मुलीला घेऊन अनिल यांच्या शेतात आला. होमहवन मांडून मांत्रिक बार्इंनी पूजा सुरू केली. याची कुणकुण लागताच ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली.ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सातवर्षीय मुलगी व साहित्यासह १८ जणांना ताब्यातही घेतले होते. परंतु नंतर त्यांच्यावर कुठलाच गुन्हा नोंद केला नाही. चार दिवसानंतर मात्र माचरट वाडी आणि निटूर ग्रामस्थांनी या मुद्द्यांवरून शिरूर अनंतपाळ ठाण्यात निवेदन दिले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेऊन जबाब घेतला. (प्रतिनिधी)
लातूरमध्ये नरबळीचा प्रयत्न फसला !
By admin | Published: July 02, 2014 4:55 AM