मुंबई: मालवणी, खारोडी आणि परिसरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘लोकमत आपल्या दारी’हे व्यासपीठ मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. बुधवार दि. १८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता मालाड (प.) मालवणी येथील सेंट अँथोनी चर्चच्या परिसरात सेव्ह अवर लँड, वॉच डॉग फाउंडेशन आणि द बॉम्बे इस्ट इंडियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार आहे. प्रथमच अशा प्रकारचा विधायक उपक्रम मालवणी येथे होत असल्यामुळे, ‘लोकमत’च्या माध्यमातून येथील समस्या मार्गी लागतील, असा विश्वास येथील नागरिकांना वाटत असून, मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाड्यामध्ये आशेचा किरण निर्माण झाल्याचे वॉच डॉग फाउंडेशनचे संचालक ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी सांगितले. सेव्ह अवर लँडच्या डॉल्फी डिसोझा, गर्ग पेरिरा, स्टॅन्ली फर्नांडिस, वॉच डॉग फाउंडेशनचे ग्रॉडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा आणि द बॉम्बे इस्ट इंडियन असोसिएशनचे ब्रायन परेरा यांनी ‘लोकमत आपल्या दारी’या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.या कार्यक्रमात प्रामुख्याने नव्या विकास आराखड्यात गावठाणे आणि कोळीवाडे झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याचा पालिकेचा असलेला डाव, रस्ता रुंदीकरणाची समस्या, अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांच्या समस्या, रस्त्यांची झालेली दैन्यावस्था आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे, कचऱ्याच्या विल्हेवाटीची गंभीर समस्या या विविध विषयांवर ऊहापोह होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन पिमेंटा आणि अल्मेडा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचा आज शुभारंभ
By admin | Published: May 18, 2016 2:21 AM