मुंबई : भारतीय बनावटीच्या पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने हाती घेतलेले ‘प्रोजेक्ट-७५’ अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या सहाव्या आणि अंतिम पाणबुडीचा औपचारिक जलावतरण सोहळा बुधवारी पार पडला. पुढील वर्षभर कठोर सागरी परीक्षा पार केल्यानंतर ‘वागशीर’चा भारतीय नौदलातील समावेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.
संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वागशीर’च्या जलावतरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार अरविंद सावंत, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, एमडीएलचे नारायण प्रसाद, आदी मान्यवर उपस्थित होते. माझगाव गोदीत प्रोजेक्ट -७५ अंतर्गत सहा पाणबुड्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यांपैकी कलवरी, खांदेरी, करंज आणि वेला या चार पाणबुड्या यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. पाचवी पाणबुडी ‘वगीर’ सध्या सागरी चाचण्या देत आहे. वागशीर या पाणबुडीला सागरी चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. यशस्वी सागरी चाचण्यांनंतर वागशीरचा भारतीय नौदलातील समावेशाचा मार्ग मोकळा होईल.
हिंद महासागरात आढळणाऱ्या वागशीर या आक्रमक माशावरून या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले आहे. स्कॉर्पियन वर्गातील पाणबुड्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या वर्गातील पाणबुड्या पाण्याखाली किंवा पृष्ठभागावरून पाणतीर आणि ट्यूब-लॉँच अँटी-शिप क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करू शकतात. अत्यंत कमी आवाज आणि समुद्रात शत्रूच्या नजरेत येणार नाही, अशा बांधणीमुळे स्कॉर्पियन वर्गातील पाणबुड्यांना सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. शत्रुपक्षाच्या पाणबुडीविरोधी मोहिमा, हेरगिरी, अशा कामांसाठी या पाणबुडीचा वापर होतो.
५० दिवस करते प्रवास- सर्व प्रकारच्या नाविक मोहिमांमध्ये भाग घेता येईल अशा प्रकारे या पाणबुड्यांची बांधणी करण्यात आली आहे. - या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, तर उंची १२.३ मीटर असून ३५० मीटरपर्यंत ही पाणबुडी समुद्रात खोलवर जाऊ शकते. - शिवाय पंचेचाळीस ते पन्नास दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करू शकते.