मुंबई- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. समाजात स्वच्छतेचा संदेश पोहचविणारे संत गाडगेबाबा यांनी ज्या मोटारीतून राज्यात प्रवास केला होता त्या मोटारीचे पालखीत रूपांतर करण्यात आले असून ही पालखी राज्यभर स्वच्छतेचा संदेश देईल. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या पालखी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियान कालावधीत पालखी मार्गावरील गावे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी भेटी देऊन स्वच्छता स्वयंसेवक स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. यादरम्यान अस्वच्छ ठिकाणे लोकसहभागातून स्वच्छ केली जाणार आहेत. ज्या ठिकाणी स्वच्छता पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी पथनाट्य, प्रवचने किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छता पालखीच्या सन्मानार्थ प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालखीच्या वास्तव्याच्या कालावधीचे दिवस हे ह्यस्वच्छता दिवसह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. स्वच्छता पालखीचा मार्ग कोकण विभागात (२ ते ११ आॅक्टोबर), पुणे विभाग (१२ ते २० आॅक्टोबर), नाशिक विभाग (२१ ते २९ आॅक्टोबर), औरंगाबाद विभाग (३० ते ११ नोव्हेंबर), नागपूर विभाग (१२ ते २१ नोव्हेंबर) आणि अमरावती विभाग (२२ ते ३० नोव्हेंबर) या स्वच्छता पालखी कार्यक्रमाचा समारोप संत गाडगेबाबा यांच्या अमरावती येथील समाधीस्थळी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता पालखी अभियानाचा शुभारंभ
By admin | Published: October 03, 2016 5:14 AM