मुंबई – मागील अनेक वर्षापासून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु आता प्रत्यक्षात येत्या १६ सप्टेंबर रोजी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुरेखा पुणेकर(Surekha Punekar) अधिकृतरित्या राष्ट्रवादीत(NCP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील.
सुरेखा पुणेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याचं नेहमी बोललं जायचं. मागील वेळी पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं बोललं होतं. तेव्हापासून सुरेखा पुणेकर राजकीय पक्षात प्रवेश करणार हे निश्चित होतं. राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी एका नावावर आक्षेप असल्यास सुरेखा पुणेकर यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
कोण आहेत सुरेखा पुणेकर?
सुरेखा पुणेकर या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आहेत. लावणी म्हटले की डोळ्यासमोर येते ती म्हणजे अदाकारा व लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची कला. लावणी या लोकनृत्याची परंपरा जिवंत ठेवण्यात तसेच नवीन पिढीला या परंपरेची ओळख करून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या ८व्या वर्षांपासून लावणी आत्मसात केली आणि तेव्हा पासूनच लावणी व सुरेखा पुणेकर हे दोन समानार्थी शब्द झाले. त्यांच्या कलेचे कौतुक आजही सगळीकडे होत असतं. मागील लोकसभा निवडणुकीत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळेल असं बोललं जातं होतं. परंतु काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं होतं.
सुरेखा पुणेकर या आज लावणी समाज्ञी असल्या तरी त्यांच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हमालीचे काम करत असत. अनेकवेळा खायला देखील त्यांच्या घरात काहीही नसायचे. पण या सगळ्या वाईट परिस्थितीवर मात करत त्यांनी आज इतके यश मिळवले. सुरेखा पुणेकर यांना महाराष्ट्रात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळाली होती