मुंबई : लोकांचा विश्वास संपादित केल्याशिवाय सहकार क्षेत्रात यश मिळू शकत नाही. परंतु सहकार क्षेत्रात भाजपावर लोकांचा विश्वास नसल्यामुळे सरकारने अध्यादेशाच्या आडून आपल्या मर्जीतील सावकारांना सहकारात घुसविण्याचा डाव रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.‘५ जानेवारीला राज्य सरकारने सहकारी बँकेच्या संचालकांना अपात्र ठरविण्याबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या अध्यादेशात जिथे सरकारी भागभांडवल आहे, तिथे सरकारच्या वतीने दोन अशासकीय सदस्य नेमण्याचे नमूद केले होते. त्यानंतर ८ तारखेला नवीन अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सहकार क्षेत्रात भाजपा-सेनेला स्थान नाही. या दोन अध्यादेशांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र मोडीत काढणे किंवा या माध्यमातून आपली माणसे सहकार क्षेत्रात घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला. १२ जानेवारी २०१२ रोजी या देशात सहकार संस्था संदर्भातील घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राला अधिक लोकतांत्रिक स्वरूप दिले पाहिजे, असा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. लोकतांत्रिक पद्धतीने निवडून न येणाऱ्या लोकांना सहकारात घुसविण्याचा निर्णय कुठेतरी लोकतांत्रिक व्यवस्थेला मारक असल्याचे ते म्हणाले.
‘सावकारांसाठीच कायद्यात बदल!’
By admin | Published: January 08, 2016 3:44 AM