पुणे : आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. मात्र, ही संकल्पना जपली नाही, तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी पुण्यात दिला.भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारती विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रबोधन व्याख्यानमालेत मिस्रा बोलत होते. या वेळी न्यू लॉ कॉलेज आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे उद्घाटनही सरन्यायाधीश मिस्रा यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते.सरन्यायाधीश म्हणाले की, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करीत समाजाची उभारणी व्हावी. लोकशाहीत प्रत्येक अधिकाराला महत्त्व आहे, पण सर्वच अधिकार परिपूर्ण नाहीत. मात्र, हक्क आणि अधिकारांच्या बाबतीत कोणतीही तडजोड झालेली नाही. आपण सध्या लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहात आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण जागृत राहिले पाहिजे.आपल्याकडे घटनात्मक लोकशाही आहे. राज्यघटनेच्या संरचनेत संरक्षित हमी मिळणे हे कोणत्याही लोकशाही व मुक्त समाजाची लक्षणे आहेत. आपल्याकडे नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले आहेत, पण त्या अधिकारांचा वापर घटनेच्या चौकटीत व्हावा, असेही सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी स्पष्ट केले.पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागांत उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या कामांचेही सरन्यायाधीशांनी कौतुक केले.
...तर कायद्याचे राज्य कोसळेल, सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 6:40 AM