मुंबई : खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होते. ती थांबविण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. ‘क्लिनिकल एस्टाबलिशमेंट अॅक्ट’नुसार रुग्णालयात प्रत्येक उपचार आणि चाचणीसाठीचे निश्चित दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. शिवसेना सदस्या नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य विभागावर मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले की, खासगी रुग्णालयातील रुग्णांची आर्थिक लूट टाळण्यासाठी कायदा करण्यात येईल. रोगराईला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर प्रतिबंध घालणाराही कायदा करण्यात येणार आहे. चर्चेत आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. दरवर्षी तब्बल ४ कोटी ७० लाख लोक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा लाभ घेतात. यात दरवर्षीच्या १ लाख ६४ हजार ३२९ मोठ्या आणि २ लाख १ हजार ९८७ छोट्या शस्त्रक्रियांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
‘रुग्णांची लूट थांबविण्यासाठी कायदा आणणार’
By admin | Published: April 02, 2016 1:29 AM