मुंबई : गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे, दारू पिऊन गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहून नेणे यापुढे चांगलेच महागात पडणार आहे. अशा कृती करणाऱ्या बेदरकार वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज ही माहिती दिली. दारू पिऊन वा अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालविणाऱ्यांचे लायसन्स तर रद्द केले जाईलच; पण त्यांच्यावरील खटला न्यायालयात चालेल तेव्हा त्यांना कैदेचीच शिक्षा करावी, अशी ठाम भूमिका सरकारच्या वतीने मांडली जाईल, असे रावते यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या नव्या नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार उत्सुक आहे.सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे दुचाकीचालकांना हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. या आदेशाची तसेच चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावण्याच्या आदेशाचीही राज्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. हेल्मेट न घालणारे वा सीटबेल्ट न लावणाऱ्यांचे दोन तास समुपदेशन करण्यात येईल आणि हे समुपदेशन अनिवार्य असेल, असे रावते यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)नजर सीसीटीव्हीची मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असेल. सीसीटीव्ही नेटवर्कमुळे गाड्यांचा क्रमांक टिपला जाईल आणि आरटीओतून त्या गाडीच्या मालकाचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. वाहनांच्या नंबर प्लेटना आरएफआयडी यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर त्या वाहनाबाबतची संपूर्ण माहिती तत्काळ मिळू शकेल, असे रावते म्हणाले.रिक्षा परवान्यांचे फेरवाटपराज्यात ६० हजार आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आॅनलाइन पद्धतीने लॉटरी प्रक्रिया राबवून हे परवाने दिले जात आहेत. त्यातील ५ टक्के परवाने हे महिलांसाठी आरक्षित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. हे परवाने घेणाऱ्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत ७0५ तळीराम अडकले जाळ्यातमुंबई - नववर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या तळीराम चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यात ७0५ तळीराम चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मुंबईत ९0 ठिकाणी नाकाबंदीसाठी २५0 अधिकारी आणि २,५00 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ७0५ तळीराम चालकांना पकडून प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची कारवाई केल्याचे वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले. उत्तर आणि पूर्व मुंबईत सर्वाधिक कारवाई झाली. मागील वर्षी ५२३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यात ३७0 दुचाकीस्वारांचा समावेश होता.विनाहेल्मेट सुसाटदारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करताना विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली. १ हजार ९0६ दुचाकीस्वारांना पकडण्यात आले. त्याचप्रमाणे १ हजार १३५ नो पार्किंग करणाऱ्या आणि ५९ बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
बेभान चालकांना कायद्याचा चाप
By admin | Published: January 02, 2016 8:37 AM