नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारी वकिलांचे कार्यालय अस्तित्वात असताना शासनांतर्गतच कार्य करणाऱ्या वन विभागासाठी वकिलांचे स्वतंत्र पॅनल नेमून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत होती. त्यामुळे हे पॅनलच भंग करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनास दिले आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने हे आदेश देताना शासनाची कानउघाडणी केली आहे. नागपूर खंडपीठात राज्य शासनाशी संबंधित प्रकरणांचे कामकाज पाहण्यासाठी सरकारी वकिलांचे कार्यालय अस्तित्वात आहे. असे असताना वन विभागासाठी वकिलांच्या स्वतंत्र पॅनलची काहीच गरज नाही. राज्य शासनाचे अस्तित्व एकच आहे. यामुळे सरकारी वकील कार्यालयानेच शासनाच्या सर्व विभागांचे प्रतिनिधित्व करायला पाहिजे. सरकारी वकील कार्यालय व विविध विभागाच्या स्वतंत्र पॅनलमधील वकिलांना शेवटी करदात्यांच्या पैशांतूनच पारिश्रमिक दिले जाते. अशाप्रकारे सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्यास काहीच अर्थ नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ग्रीन ट्रिब्युनल, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय इत्यादी न्यायालयात नियमित सरकारी वकील कार्यालय नाही. अशा न्यायालयात शासनाच्या विविध विभागाला स्वतंत्र वकील नेमता येतील. तसेच, एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणात विशेष वकील नियुक्त करण्याचा निर्णयही शासनाला घेता येईल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. परिणामी हा आदेश केवळ नियमित सरकारी वकील कार्यालय अस्तित्वात असलेल्या न्यायालयातच लागू होणार आहे.
वकिलांवर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी !
By admin | Published: February 29, 2016 3:26 AM