ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन देऊनही एका वकिलाला पौड पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांनी गोंधळ घातला. जामीन मिळालेल्या वकीलाची अटक बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष न्यायाधीश मंगला धोटे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना सोमवारी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. आकाश मारणे यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. मारणे यांनी अटकपुर्व जामिनासाठी अॅड. विशाल दुशिंग यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला होता. पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे यांनी मारणेंच्या वडीलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत मारणेला हजर राहण्यास सांगत मारहाण केली होती. मारणे यांनी आपल्याला अटकपुर्व जामीन मंजूर असल्याचे सांगूनही ते हजर झाल्याशिवाय वडीलांना सोडणार नसल्याची भुमिका पोलिसांनी घेतली.
जेव्हा मारणे पोलीस ठाण्यामध्ये गेले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. अॅड. दुशिंग यांनीही पोलीस ठाण्यात दुरध्वनी करुन मारणेंना अटकपुर्व जामीन मंजूर झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे अॅड. दुशिंग यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन पुन्हा माहिती दिली. पोलिसांना माहिती देऊनही मारणेंना अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे शिवाजीनगर न्यायालयातील संतप्त झालेले वकील उपनिरीक्षक मोरे यांना मारहाण करण्याच्या मनस्थितीत होते. परंतु, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. गिरीश शेडगे, अॅड. एन. डी. पाटील, अॅड. मिलिंद पवार आदी वरिष्ठ वकिलांनी स्वत: संरक्षण देत मोरे यांना न्यायालयात नेले. मारणे यांनी अर्ज करुन आपली अटक बेकायदा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मारणे यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या वकीलपत्रावर १५० पेक्षा अधिक वकिलांनी सह्या केल्याचे अॅड. दुशिंग यांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने उपअधीक्षकांना नोटीस बजावली असून मारणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे.