लोकमत न्यूज नेटवर्क मालवण: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी आपटे व डॉ. पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सरकारी पक्षाच्या वतीने मांडताना अभियोक्ता ॲड. तुषार भणगे म्हणाले, जयदीप आपटे हा निष्कलंक असता तर गुन्हा दाखल झाल्यापासून इतके दिवस फरार राहिला नसता. त्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. आपटे आणि पाटील यांना पुतळ्याच्या संदर्भातील कामाचे टेंडर कोणाकडून मिळाले, त्याची प्रक्रिया काय होती याचा तपास होणे बाकी आहे.
तपास काम प्राथमिक टप्प्यावर आहे. गुन्हे दाखल असलेल्या दोघांनाही समोरासमोर बसवून पोलिसांना चौकशी करावयाची आहे. संशयित आरोपींचा या कामा मागील उद्देशन समोर येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अन्य तपास काम बाकी असून पोलिसांची तपासात प्रगती दिसत असल्याने दोघांनाही पुढील दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. आपटे आणि पाटील या दोघांनीही पुतळा उभारणीचे काम एकत्र केले आहे. पुतळा बनविण्याच्या कामात अजूनही कोणा, कोणाचा सहभाग होता, पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य कुठून घेण्यात आले, त्याचा दर्जा काय होता. याचाही तपासात शोध घेण्यात येणार असल्याचे सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
जयदीप आपटे यांच्या वतीने न्यायालया समोर बाजू मांडताना ॲड. गणेश सोहनी म्हणाले, पंतप्रधानांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्यामुळे नौदलासह अन्य यंत्रणांनी पुतळ्याच्या कामाची चाचपणी व खातरजमा केली होती. या नंतरच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या गुन्ह्यात दाखल करण्यात आलेले शारीरिक दुखापती संदर्भातील कलमे चुकीची आहेत. वस्तूतः कुणालाही दुखापत व्हावी या उद्देशाने पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले नव्हते. त्याचप्रमाणे पर्यटकांसह अन्य कुणालाही या ठिकाणी दुखापत झाल्याच्या घटनेची नोंद नसतानाही हत्येचा प्रयत्न व शारीरिक दुखापती संदर्भातील कलमे या प्रकरणात लागू करण्यात आली असल्याचे ॲड. सोहनी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
पुतळा दुर्घटनेची शासनाने तज्ञ समितीद्वारे चौकशी करून त्याच्या अहवाल आल्या नंतरच दोषींवर गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी पुतळे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. उज्जैन येथे महाकाल मंदिरासमोरील सात पुतळे वादळात कोसळले होते. मध्यप्रदेश सरकारने याप्रकरणी लोकायुक्तांकडे चौकशी सोपवीली असल्याकडे ॲड. सोहनी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
स्वतःची सुटका करण्यासाठीच अवघ्या दहा तासात आपटे विरोधात गुन्हा दाखल.... धातू शास्त्राचे कोणतेही ज्ञान नसताना सुद्धा सिविल इंजिनियर राहिलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांने केलेल्या आरोपांवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातून आपली सुटका व्हावी आणि कुणावरही तरी हे प्रकरण ढकलावे या उद्देशाने अत्यंत घिसडझाईने व दडपणाखाली घटना घडल्यापासून अवघ्या दहा तासात आपटे विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. हे संभ्रम निर्माण करणारे असल्याचे मत ॲड. सोहनी यांनी न्यायालयात व्यक्त केले.
दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश एम आर देवकाते यांनी दोन्ही संशयीतांना १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. डॉ. चेतन पाटील याचे भाऊ व नातेवाईक न्यायालयात हजर राहिले होते. पाटील यांचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या वतीने न्यायालयात लेखी स्वरूपात बाजू मांडण्यात आली.