ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दणक्यात झाला असा दावा करणा-या शिवसेनेच्या मुखपत्रातून सामनामधून आज शरद पवारांवर बोचरी टीका करण्यात आली आहे. मध्येच भाजपावरही शरसंधान साधताना शरद पवार सध्या रिकामे असून पै पाहुण्यांना बारामतीला बोलावून लॉजिंग बोर्डींगचा व्यवसाय त्यांनी उघडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. अर्थात, हा टोला अरूण जेटलींच्या बारामती भेटीसंदर्भात आहे, हे उघड आहे.
उद्धव ठाकरेंनी सामनामधून केलेल्या टीकेतील काही भाग:
काँग्रेस व राष्ट्रवादीची गांडुळे वळवळतात आणि नष्ट होतात. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण हे गांभीर्याने घ्यावे असे नाही. ते कधी धर्मनिरपेक्ष होतील तर कधी भाजपचे गुणगान करतील याचा भरवसा नाही. दिल्लीत सध्या विशेष काम नसल्याने बारामतीतील ‘गोविंद बागेत’ राजकीय पै-पाहुण्यांना बोलवून ‘लॉजिंग बोर्डिंग’चा नवा व्यवसाय त्यांनी उघडला आहे व ते त्यातच मन रमवीत आहेत. उतारवयाप्रमाणे त्यांचे राजकारणही उताराला लागले आहे.
शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील दसरा मेळाव्याकडे सार्या देशाचे लक्ष लागले होते. राजकीय दुश्मनांबरोबरच राजकीय मित्रांचे डोळे, कान शिवतीर्थावर लागले होते. अफवा व घोषणांचा सट्टेबाजारही अशा वेळेला जोरात असतो व जो तो आपणच ‘शहाणे’ असल्याच्या थाटात आपले बेभरवशाचे पत्ते फेकत असतो, पण अशा डावात शिवसेनेला अजिबात रस नाही.
शिवसेनेबाबत कुणाला काय म्हणायचे आहे त्यापेक्षा शिवसेनेला काय म्हणायचे आहे व शिवसेना काय करणार आहे यावरच राजकारण ढवळून निघत असते. शिवसेनेसमोर आज कुणाचेही आव्हान नाही.