Laxman Hake News: एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होत असून, दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत असून, आमदार पाडण्याचे इशारे दिले जात आहेत. यातच ओबीसींचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही विधानसभा निवडणुकीत निवडून देणार का, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणास धक्का लागता कामा नये तसेच कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी लावून धरली आहे. आष्टी तालुक्यातील एका गावाला भेट देत, तेथील ग्रामस्थांशी लक्ष्मण हाकेंनी चर्चा केली. यावेळी वेळ पडल्यास प्रसंगी आझाद मैदानावर दाखल होऊ, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला.
ओबीसी आरक्षण संपवणाऱ्याला निवडून देणार का?
ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही निवडून देणार आहात का? २८८ आमदारांनी एक कार्ड तयार करून ओबीसी समाज बांधवांच्या प्रश्नावर किती बोललात? हे सांगावे. आज मनोज जरांगे पाटील यांना सर्व आजी-माजी आमदार, खासदार पाठिंबा देत आहेत. तर तुम्ही कोणाचे २८८ आमदार पाडणार आहात? अशी विचारणाही लक्ष्मण हाके यांनी केली.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोकराव चव्हाण यांनी दोन ते तीन वेळा भेट घेतली. शरद पवार हे पण भेटले. आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेड कारपेटच टाकतात. पण या चारही मुख्यमंत्र्यांना राज्यात सामाजिकदृष्ट्या मागास, बारा बलुतेदार राहतात याचे थोडसुद्धा सोयर सुतक नसावे. हे मंत्री ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत. यांना फक्त जरांगेंच्या मतांची काळजी पडली. पण, ओबीसी बांधवांच्या मतांचे काही पडलेले नाही, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली होती.