नवी मुंबई : लक्ष्मी पूजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी तसेच पणत्यांनी शहर उजळून निघाले. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी पहाट, पणती उत्सव, रांगोळी स्पर्धा, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. नवीन कपडे, पुजेचे साहित्य, मिठाई खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. व्यावसायिकांनी लक्ष्मीपूजनानिमित्त विविध सवलतींचा ग्राहकांवर भडिमार केला असून बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. घराघरात तसेच व्यावसायिक, दुकानदार, औद्योगिक वसाहतींमध्ये लक्ष्मीपूजनाची उत्साहात साजरे करण्यात आले. बाजारात उपलब्ध असलेल्या शाडूमातीच्या लहान आकारातील लक्ष्मीच्या आकर्षक मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती. प्रामुख्याने व्यापाऱ्यांकडून या मूर्तीला प्राधान्य देण्यात आले. यासाठी भरीव व पोकळ या प्रकारात सराफ व्यावसायिकांकडून पूजा उपकरणांसह चांदीच्या तसेच चांदीचा वा सोन्याचा मुलामा असलेल्या लहान-मोठ्या आकारातील लक्ष्मीच्या मूर्तीही बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होत्या. यात महालक्ष्मी, गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी असे विविध प्रकारही आहेत. लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी,पूजेसाठी आवश्यक बत्तासे, लाह्यांना विशेष मागणी होती. शहरातील मंदिर परिसर, दुकाने, मॉल्समध्ये आकर्षक रोषणाई करून सजविण्यात आले होते. व्यावसायिकांकडून या दिवसाचे सोने करून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट फोन, फर्निचर, मोबाइल, वस्त्रे आदी वस्तूंवर ३० ते ५० टक्के दराने आकर्षक सवलतींसह खास भेटवस्तूंचे नियोजन करण्यात आले होते. सराफ व्यावसायिकांनी मजुरीवर सूटसह आकर्षक भेटवस्तूची आॅफर देऊ केल्याने महिला वर्गाने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत दागिन्यांची खरेदी केली. खाजगी नोकरदारवर्गाला सलग तीन दिवस लागून सुट्या मिळाल्याने दोन-तीन दिवसांच्या सुटीत पर्यटन स्थळाला भेट देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. नवीन वर्षात व्यापाराचा संपूर्ण हिशोब नव्या वहीत मांडण्याची सुरुवात व्यापारी करतात. चोपडा पूजनासाठी लक्ष्मीचे चित्र असलेल्या वह्या खरेदीसाठी वाशीतील एपीएमसी बाजारात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. (प्रतिनिधी)>नेरुळ रेल्वे स्थानक येथे लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सुगम संगीत, मराठी गाणी तसेच भावगीत ेयावेळी सादर करण्यात आले. सिडकोचे माजी संचालक तथा नगरसेवक नामदेव भगत हे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
शहरात आतषबाजीत लक्ष्मीपूजन
By admin | Published: October 31, 2016 2:37 AM