ऑनलाइन लोकमत/यशवंत सादूल
सोलापूर, दि. 1 - सोलापूर श्रमिकांचं शहर... कष्ट हेच इथल्या मातीचा शिरस्ता. याच बहुभाषिक पूर्वभागातील दिव्यांग असलेल्या लक्ष्मीनं इयत्ता बारावीची परीक्षा चक्क पायाने लिहून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मंगळवारपासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू झाली. सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जन्मत: दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी संजय शिंदे हिने इंग्रजीचा पेपर पायात लेखणी धरून लिहून पूर्ण केला. तिच्या या जिद्दीकडे पाहून सबंध वर्गातील परीक्षार्थींसह पर्यवेक्षकही अवाक् झाले.
हैदराबाद रोड, विडी घरकूल येथील गोंधळी वस्तीत दहा बाय बाराच्या पत्राशेडमध्ये राहणारी लक्ष्मी ही रिक्षाचालकाची मुलगी. जन्मत: दोन्ही हातांनी अपंग असलेल्या लक्ष्मीला शाळेला पाठविणे तसे दुरापास्तच होते. मात्र जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या बालवाडीकडे लहानपणीच तिची पावले आपसूकपणे वळायची. दिवसभर शाळेबाहेर बसून ती गाणी ऐकायची. बडबडगीते म्हणायची. तिची शाळेबद्दलची आस्था पाहून वडिलांनी शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यासाठी विनंती केली. पण दोन्ही हात नसल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला. तरीही लक्ष्मी शाळेजवळ जाऊन बसायची.
एकेदिवशी मुख्याध्यापकांनी पालकाच्या जबाबदारीवर तिला बालवाडीत प्रवेश दिला. लिहिता येत नसले तरी ती अभ्यासात अन्य मुलींसारखी जेमतेम हुशार होती. इतरांच्या मदतीने परीक्षा देत ती सातवीपर्यंत पोहोचली. संभाजीराव शिंदे प्रशालेत आठवीत असताना तिने ठरविले, काही झाले तरी आपण स्वत: पेपर लिहायचा. मग ठरले. अथक प्रयत्नांनंतर तिने पायात पेन धरून नववीचा पेपर दिला. मार्च २०१५ मध्येही तिने दहावी बोर्डाची परीक्षा स्वत:च्या पायाने लिहून दिली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत जायची तिची जिद्द आहे. यंदा ती वालचंद कला महाविद्यालयात बारावीला असून, बुधवारी (1 मार्च) तिने त्याच महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पायाने ती बारावीचे पेपर सोडवत आहे. व्यंगावर मात करीत लक्ष्मीने ज्ञान ग्रहण करण्यासाठी चालविलेली तपस्या फळास आल्याशिवाय राहणार नाही. समाजातील लक्ष्मीसारख्या हजारो भगिनींना तिची ही जिद्द प्रेरणादायी ठरणार आहे.
पायानेच सर्व काही...
दोन्ही हात नसले तरी लक्ष्मी आपली सर्व कामे स्वत:च्या पायाने करते. अभ्यासाव्यतिरिक्त तिला चित्रकला अवगत असून, काव्यलेखनाचाही छंद आहे. घरकामात आईला मदत करताना आपणास आश्चर्य वाटेल की, ती चक्क स्वयंपाकही करते. नुकतीच संगणकाची एमएस-सीआयटी परीक्षाही ती उत्तीर्ण झाली आहे. साहित्य, कला, तंत्रज्ञान या क्षेत्रात ती चौफेर प्रगती करीत आहे.
मुलीसाठी काहीपण
जन्मत: दिव्यांग असलेल्या लक्ष्मीचं पुढचं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाचे कौतुक सर्वप्रथम लोकमतने केल्यानंतर अनेक संस्थांनी मदतीचा हात दिला. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवापाड कष्ट करण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया रिक्षाचालक वडील संजय शिंदे आणि गृहिणी आई कविता यांनी व्यक्त केली.
पायाने लिहून लक्ष्मी बारावीचा पेपर सोडवित आहे, तिच्या या जिद्दीला लोकमत परिवाराकडून सलाम..