मुंबई : येत्या १ आॅगस्टपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) सरसकट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधिन असून, तशी सुधारित अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला दिली. वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनासाठीच एलबीटी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, वार्षिक ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेले केवळ ४५० व्यापारी आहेत आणि त्यांनाही एलबीटी लावू नये, अशी मागणी पुढे आली आहे. त्याबाबत लवकरच बैठक होईल. आधीच्या आदेशाने ९९.९९ टक्के व्यापाऱ्यांना दिलासा मिळालेला आहेच. उर्वरित व्यापाऱ्यांना दिलासा दिला नाही, तर भाजपाने जाहीरनाम्यातील आश्वासन पाळले नाही, अशी टीका होईल. त्यापेक्षा सरसकट सर्वांनाच एलबीटी माफ करण्याची भूमिका घेण्याचा निर्णय होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत मात्र जकात कर कायम राहील. २५ महापालिकांमधून मात्र तो हद्दपार होईल. (विशेष प्रतिनिधी)
एलबीटी १ आॅगस्टपासून सरसकट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2015 3:07 AM