ठाणे : महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या एलबीटीचे उत्पन्न मागील दोन महिन्यांपासून १० ते १२ कोटींनी घटल्याची बाब समोर आली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या एकूण उत्पन्नावर झाला आहे. महापालिकेच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढेच पैसे शिल्लक असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच आता एलबीटी विभागही खडबडून जागा झाला आहे. या विभागाने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिकेचा आर्थिक डोलारा कोलमडला असून ही परिस्थिती आजही सुधारलेली नाही. अपेक्षित वसुली होत नसल्याने आणि एस्कॉर्ट बंद झाल्याने तिजोरीत केवळ कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढाच निधी शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता थकबाकीदार व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा तात्काळ करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. परंतु, या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर एलटीबी विभागाने पुन्हा थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, नुकत्याच केलेल्या एकदिवसीय कारवाईत ठाण्यातील चार दुकानांवर एलबीटीच्या पथकाने धाडी टाकल्या असून त्यांच्याकडील कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगून निर्धारित लक्ष्यदेखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालिकेने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
एलबीटी विभागाचे धाडसत्र
By admin | Published: September 22, 2014 2:33 AM