ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - राज्यातील विधानसभा निवडणुकीत स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी रद्द करु असे आश्वासन देणा-या भाजपाने आता हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. १ एप्रिलपासून राज्यातून एलबीटी हद्दपार होण्याची शक्यता असून एलबीटी रद्द झाल्यामुळे होणारी तूट भरुन काढण्यासाठी व्हॅट वाढवण्यात येईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी एलबीटी म्हणजे लुटो बाटो टॅक्स असल्याचे सांगत सत्तेवर आल्यास एलबीटी रद्द करु असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येताच देवेंद्र फडणवीस सरकारने एलबीटी रद्द करण्याविषयी सावध भूमिका घेतली होती. त्यामुळे मोदींच्या आश्वासनावर फडणवीस सरकारने यू टर्न घेतल्याची टीकाही सुरु झाली होती. अखेरीस हे आश्वासन पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरु केल्याचे सूत्रांकडून समजते.१ एप्रिलपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१६ मध्ये केंद्र सरकार देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्याची चिन्हे आहेत. जीएसटी लागू होईपर्यंत महापालिकेच्या तिजोरीतील तूट भरुन काढण्यासाठी व्यापा-यांवर अतिरिक्त व्हॅटचा बोजा लादला जाईल असेही समजते.