काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ठरले : चिघळलेला वाद आणखी ताणायचा नाही, तुटू तर द्यायचेच नाही
नवीन सिन्हा - नवी दिल्ली
काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा गुंता दोन दिवसांत सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्याला तत्त्वत: सहमती दर्शविली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रादेशिक नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची भाषा केल्याने चिघळलेला वाद आणखी ताणायचा नाही आणि तुटू तर द्यायचेच नाही, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी ठरविले आहे.
शनिवारपासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे जागांच्या संख्येचा वाद संपुष्टात आणण्यावर भर दिला जात आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र
लढण्याचे मान्य केल्याने जागांच्या वाटाघाटीला वेग दिला जाईल. महाराष्ट्रात मोठे आव्हान उभे ठाकल्याची दोन्ही पक्षांना जाणीव आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अॅण्टोनी यांनी सांगितले.
अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होणार असून, त्यात वाद निकाली काढले जातील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांसोबत राज्य पातळीवर नव्याने चर्चा चालविली आहे.
च्उपमुख्यमंत्री अजित पवार 144-144 या सूत्रवर ठाम होते. अलीकडेच पोटनिवडणुकीत भाजपाला हादरा बसल्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा महायुतीला आव्हान दिले जाऊ शकते, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते.
च्गेल्या वेळी राष्ट्रवादीने 114 तर काँग्रेसने 174 जागा लढविल्या होत्या. या वेळी सहा ते सात जागा जास्त देऊन काँग्रेस या पक्षाचे समाधान करू शकतो, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मुख्य तिढा मुंबईतील जागांचा आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला गेल्या वेळेपेक्षा किमान 7 जागा जास्त हव्या आहेत.
मौलाना मुफ्ती राष्ट्रवादीत
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी व शहर विकास आघाडीचे सुनील गायकवाड यांनी चार नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.