- सुभाष जोशी
देशातील विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करीत हक्कांसाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे काम सर्वप्रथम शरद जोशी यांनी केले. शेतीमालाला दर किती मिळतो, उत्पादन खर्च किती येतो, याचे गणितच शेतकऱ्यांना माहीत नव्हते. त्यांच्या जागृतीची चळवळ संपूर्ण देशात उभी करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. सरकारच्या शेतीविषयीच्या उदासीन धोरणाविरोधात सरकारला कोंडीत पकडण्याचे काम त्यांनी केले. ‘भारत’ व ‘इंडिया’ हे देश वेगळे कसे आहेत, हे दाखवून सरकारच्या डोळ्यांत त्यांनी अंजन घातले. शेतकऱ्यांची पिळवणूक कोणत्या मार्गाने सुरू आहे, याची शास्त्रशुद्ध मांडणी त्यांनी भाषणासह लेखणीतून केली. शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम महात्मा जोतिराव फुले यांनी केले. त्यांच्यानंतर तेवढ्याच ताकदीचे नाव कोणाचे घ्यायचे झाले, तर ते शरद जोशी यांचेच घ्यावे लागेल. देशातील कोणत्याही प्रांतात शेतकरी अडचणीत असेल, तर तिथे धावून जाऊन मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची पद्धत होती. तंबाखूचे आंदोलन चिघळल्यानंतर तितक्याच धैर्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे शरद जोशी हे एकमेव शेतकरी नेते होते. अस्मिता काय असते, हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले. सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणून त्यांच्या हक्कासाठी ते मैदानात उतरले. आयुष्यभर शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. हे करीत असताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, गुन्हे दाखल झाले, पण त्याची पर्वा न करता शेतकरी सुखी झाला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्यांच्याकडे उमेद होती. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या नेतृत्वाची पोकळी सदैव जाणवत राहील.
(लेखक निपाणीचे माजी आमदार व शरद जोशी यांचे सहकारी आहेत.)