विधानसभेत महाशिवआघाडी; तरी परभणीत राष्ट्रवादीला प्रतीक्षा भाजपची ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:20 PM2019-11-21T12:20:06+5:302019-11-21T12:20:47+5:30
काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्या राष्ट्रवादीला पुन्हा भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार असून भाजपच्या त्या पाच सदस्यांची राष्ट्रवादीला पुन्हा प्रतीक्षा असणार आहे.
मुंबई - राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रयोगाची तयारी सुरू असून यामुळे महाशिवआघाडी जन्माला येणार आहे. या आघाडीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे. मात्र अनेक जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या अभद्र युत्या यानिमित्ताने पुन्हा समोर येणार आहे. परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सोडतीत खुल्या वर्गातील महिलेला सुटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी दिसत आहे. त्याचेवेळी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकदा भाजपच्या पाच सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे.
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी 54 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादीकडे केवळ 24 सदस्य आहेत. बहुमतासाठी राष्ट्रवादीला आणखी चार सदस्यांची आवश्यकता आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पाच सदस्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला होता. त्यावेळी उज्ज्वला राठोड यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी वर्णी लागली होती.
आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जुना कित्ता गिरवत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर जिल्ह्यातील काँग्रेससोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्यास, राष्ट्रवादीला भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. मात्र काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्या राष्ट्रवादीला पुन्हा भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार असून भाजपच्या त्या पाच सदस्यांची राष्ट्रवादीला पुन्हा प्रतीक्षा असणार आहे.