सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 06:26 PM2024-10-09T18:26:36+5:302024-10-09T18:28:12+5:30
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या नेत्याने आपला चेहरा फाईलने लपवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. अशातच काल मंगळवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील एका दृष्याने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. कारण सुळे यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या नेत्याने आपला चेहरा फाईलने लपवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. हा नेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा असल्याची चर्चा असून स्वत: अजित पवार यांनीही या फोटोबाबत भाष्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, "मीदेखील बातम्यांमध्ये तो फोटो पाहिला. पण तुम्हाला काय घेणं-देणं आहे, तुम्ही तुमची कामं करा, आहे त्या चॅनेलमध्ये राहा. तुम्ही २०१४ सालापासून पाहा, जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा असे नेते निवडणूक लढवण्यासाठी पक्षांतर करतात. जेव्हा एखादा मतदारसंघ आपल्याला भेटणार नाही, याची कल्पना येते तेव्हा ज्यांना आमदार व्हायचं असतं ते इतर पक्षाचे दार ठोठावत असतात. ज्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार नाहीत, त्यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागतात," अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
सुळेंच्या कारमधील तो नेता कोण?
सुप्रिया सुळेंच्या कारमधून प्रवास करताना चेहरा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले. त्यात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे नाव आघाडीवर आहे. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी फाईल लपवणारी ती व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याचा दावा केला. राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले होते. परंतु शिंगणे पुन्हा एकदा घरवापसी करत शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.