साताऱ्यातील गोळीबाराचे पडसाद विधानसभेत; अजित पवार म्हणाले, ही मोगलाई आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 01:13 PM2023-03-20T13:13:17+5:302023-03-20T13:14:39+5:30

पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील गुरेघर धरण परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला.

Leader of Opposition Ajit Pawar criticized the government for firing in Satara | साताऱ्यातील गोळीबाराचे पडसाद विधानसभेत; अजित पवार म्हणाले, ही मोगलाई आहे का?

साताऱ्यातील गोळीबाराचे पडसाद विधानसभेत; अजित पवार म्हणाले, ही मोगलाई आहे का?

googlenewsNext

मुंबई - मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम यांनी सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले. 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, १५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा मोरणा परिसरात अपघात झाला होता. अपघातावेळी त्यांची स्थानिकांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतरही दोन तीन दिवसांनी स्थानिक ग्रामस्थ व कदम यांच्यात वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने मोरणा भागात बेछुट गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिक व्यक्तींचा मुत्यू झाला. तसेच तेथील एका सोसायटीची निवडणूक व पवनचक्कीचे प्रलंबित पेमेंट हा विषय सुध्दा या गोळीबाराच्या पाठीमागे आहे असं त्यांनी सभागृहात सांगितले. 

तसेच या घटनेत मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांचा कार्यकर्ता आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांच्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणात मदन कदम व त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

काय आहे प्रकरण?
पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील गुरेघर धरण परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. श्रीरंग जाधव (वय ४५), सतीश सावंत (३०) अशी गोळीबारात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश जाधव (४२, तिघे रा. कोरडेवाडी, ता. पाटण ) हे जखमी झाले आहेत. जखमीला कराडला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोळाबार करणाऱ्या संशयित कदम यास पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोरणा विभागातील गुरेघर परिसरात राहणाऱ्या दोघांमध्ये वैयक्तिक कारणातून वाद होता. या वादातूनच चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वादावादी झाल्याचीही चर्चा आहे. या वादावादीबाबत पोलिस ठाण्यातही तक्रारी करण्यात आल्या होत्या, असे सांगण्यात येते
 

Web Title: Leader of Opposition Ajit Pawar criticized the government for firing in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.