मुंबई – २०२४ पर्यंत भाजपा पक्ष फुटेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर आता भाजपा आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. वडेट्टीवार यांच्यावर पटोले यांनी बारकाईने लक्ष ठेवावे असा टोलाही नितेश राणेंनी पटोलेंना लगावला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, नाना पटोले बॉम्ब घेऊन फिरतायेत का? भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू आहे असं सांगत त्यांनी पटोले-राऊतांना टोला लगावला.
सुनेत्रा पवारांचे काम चांगले
संजय राऊतांना पवार कुटुंब फार चांगले माहिती आहे. त्यांच्या घराचे रेशन काड्या लावण्यामुळेच येते. बारामतीबद्दल बोलणे फार लांब आहे. सुनेत्रा पवार यांचे सामाजिक काम बारामतीसह महाराष्ट्रात आहे. असंख्य लोकांना जीवदान देण्याचे काम त्या वर्षानुवर्षे करतायेत. म्हणून सुनेत्रावहिनी उद्या खासदार झाल्या तर हे महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या मतदारसंघासाठी भलं होईल असं सांगत नितेश राणेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपा-राष्ट्रवादीत वाद अशा कितीही पुड्या सोडण्याचा प्रयत्न केला तरी अजित पवार-देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे या त्रिशुळाला महाराष्ट्रातून कुणी लांब करू शकत नाही. हे तिघे फेविकॉलचे मजबूत जोड म्हणून एकत्रित आहेत. तिन्हीही प्रमुख नेते एकत्र आणि एकसंघ आहेत त्यामुळे बातम्यांमुळे वाद निर्माण होणार नाहीत असंही नितेश राणे यांनी म्हटलं.