आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असून लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांचाही बिगुल वाजणार आहे. त्यामुळे, आमदार, खासदारही लोकांमध्ये जाऊन जवळीस साधत आहेत. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी संतोष बांगर यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.
तुमच्या आई-वडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करण्यास सांगा. नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका. तुम्ही जेवला नाहीत आणि आई-वडिलांनी विचारलं की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मी त्यानंतर जेवेन. त्यानंतर संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार? या प्रश्नांची विद्यार्थ्यांकडून वदवून घेतलं. संतोष बांगर यांच्या या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतोष बांगर यांच्या या व्हिडिओवरुन निशाणा साधला आहे. संतोष बांगर महात्मा आहेत. संतोष बांगर यांना मतांचा रोग झाला आहे. त्यांना राजकारण आणि सत्तेशिवाय कोणीच दिसत नाही. संतोष बांगर लहान मुलांसमोर मतांचा बाजार करत आहेत. राज्यात गुंडाराज सुरू झालं आहे, अशी टीका संजय बांगर यांनी केली आहे. संतोष बांगरे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतीमुळे सोशल मीडियात चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे म्हटले होते. तसे न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईल, असेही त्यांनी म्हटले होते.
आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा- रोहित पवार
यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करत केली आहे.