मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे धाडसी निर्णय घेणारे आहेत. ते आपल्याला न्याय देतील हा आपल्याला विश्वास आहे. मराठा समाजाला विश्वासात घेवून मी त्यांना वेळ दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही. त्यांनाही मागे हटू देणार नाही. साहेब, समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस वाढवून घ्या. पण आम्हाला कायम टिकारे आरक्षण द्या. जीव गेला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. मी भारावून गेलो नाही महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो, टिकणारे आरक्षण द्या, असं जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. जो व्यक्ती समाजासाठी काम करतो, त्याकडे सरकारने आधीच लक्ष द्यायला हवे होते. त्यामुळे सरकारने उपोषण सोडवले असले तरी त्यात उशीर झाला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच जशी उपोषण सोडवण्याची जबाबदारी सरकारची होती तशीच आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारची आहे. त्यामुळे ही जबाबरदारी पार पाडायला हवी, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच निवडणुकीला ५ ते ८ महिने शिल्लक आहेत. या कालावधीत एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देतात की निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लोकांच्या तोंडाला पाने पुसतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या काळात सरकार आरक्षण देऊ शकले, तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील, अन्यथा लोक सर्व काही पाहत आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
साखळी उपोषण सुरू राहणार
शासनाच्या मागणीनुसार एक महिना दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. परंतु, अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहणार आहे. सरकारच्या समितीत आम्ही राहणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ठिकठिकाणी शांततेत सखळी उपोषण करावे. कोणीही कायदा हातात घेवू नये, आरक्षणाला गालबोट लागू देवू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
मनोज जरांगे कौन है..
बाबा, तुझं पोरगं भारी आहे. स्वत:साठी नाही समाजासाठी लढतोय. ते जेव्हा मला भेटला तेव्हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर समाजाच्या प्रश्नासाठी भेटला. मी परवा दिल्लीला गेलो होतो. तेथे मला विचारलं मनोज जरांगे कौन है.. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला. मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा प्रामाणिक असून, त्यामुळेच त्याला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासनही कटीबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.