मुंबई : ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी कोकणातील शिवसेना नेते जमिनी संपादित करण्यासाठी लोकांवर दबाव आणत असून, संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी धमकावले, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद देला. कोकणी माणसांच्या वाटेला जाल तर फटके देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.कोकणात होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने आणला आहे. त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे दाद का मागत नाही? असा सवाल केला असता राणे म्हणाले, आपण मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. त्यांना भेटून प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार आहे, पण उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी या प्रकल्पाला होकार का कळविला? खा. विनायक राऊत, राजन साळवी या शिवसेना नेत्यांनी व दलालांनी कोकणात शेतकºयांना धमक्या देऊन जमिनी खरेदी करणे सुरू केले आहे, असा आरोप राणेंनी केला.ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील फळबागांचे आणि माशांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे कोकणी माणूस देशोधडीला लागण्याची भीती आहे. प्रकल्पाच्या परिसरात काही अधिकाºयांनी २०० एकर जमिनी घेतल्या आहेत. पोलीस अधिकारी दमदाटी करत आहेत, याची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत, असेही राणे यांनी सांगितले.वडिलांना माफी मागायला लावलीमातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला प्रकल्पाला विरोध करू नका, आमच्या नेत्यांविरुद्ध काही बोलू नका, असे सांगून माझ्या वडिलांना माफी मागायला लावली, असा आरोप विनेश वालम यांनी याच पत्रकार परिषदेत केला. माझ्या वडिलांना कोकणातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, तेथे एका अनोळखी डॉक्टराने त्यांना बळजबरीने इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. कशाचे इंजेक्शन आहे? असे विचारले असता, इंजेक्शन फेकून ते पळून गेले, असा आरोप वालम यांनी केला.सहनशीलता संपण्यापूर्वी निर्णय घ्यामाझी सहनशीलता संपण्याच्या आत मंत्रिपदाबाबत जो काय निर्णय घ्यायचा तो घ्या, असे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्या दृष्टीने काहीच हालचाल होताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनाच्या आधी त्यांचा समावेश केला जाईल, असे सांगितले गेले. आता डिसेंबरअखेरची तारीख निघाल्याचे सांगितले जाते.
संघर्ष समितीच्या नेत्याला ‘मातोश्री’वर धमकावले , नारायण राणे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 5:09 AM