मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचं वाढत वर्चस्व आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशानंतर विरोधीपक्षातील काठावर असलेल्या नेत्यांना भाजपची भुरळ पडली. भाजपने देखील काठावर असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठी मेगाभरती घेतली होती. मात्र राज्यातील बदललेली राजकीय स्थिती पाहता विकासाचा मुद्दा सांगून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीतील 30 हून अधिक नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये गेले आहे. यामध्ये विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, जयदत्त क्षीरसागर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, राणा जगजीतसिंह पाटील, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, आदी नेत्यांचा समावेश आहे.
आधीच पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, वैभव पिचड, जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश आहे. या नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यापैकी बहुतांशी नेत्यांनी विकासाच्या मुद्दावरच आपण सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
दरम्यान भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे. यामुळे विकासाचं कारण सांगणाऱ्या नेत्यांचीच जोरात चर्चा सुरू आहे.