मुंबई : गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून मराठवाड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या दौऱ्यावर शरद पवार थेट बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
सकाळी बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची ते पाहणी करतील. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करतील. रात्री तुळजापूरला मुक्काम केल्यानंतर सोमवार दिनांक १९ आॅक्टोबर रोजी पुन्हातुळजापूर परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी परांडा गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.मुख्यमंत्री उद्या सोलापुरात -राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सोमवारी सकाळी विमानाने सोलापूरला पोचतील. तेथून सकाळी साडेनऊला मोटारने सांगवी खुर्दकडे (ता. अक्कलकोट) प्रयाण तेथील नुकसानीची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करतील. सकाळी ११ वाजता सांगवी पुलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी. ११.३० वाजता अक्कलकोट येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी करून तेथून रामपूरकडे प्रयाण तेथील पाहणी आटोपून दुपारी १२.१५ वाजता बोरी उमरगेकडे प्रयाण. तेथील पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करून दुपारी तीननंतर अधिकाºयांशी चर्चा करुन ते मुंबईकडे प्रयाण करतील.देवेंद्र फडणवीस करणार पुण्यातून सुरुवातविधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवारपासून तीन दिवस राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. बारामतीपासून ते दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडामार्गे ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर २० आॅक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. २१ आॅक्टोबर रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.