विधानसभेसाठी ‘वंचित’च्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:17 PM2019-07-26T14:17:55+5:302019-07-26T14:25:24+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापुरात आवाहन
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आल्या. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही वक्तव्य केले असले तरी आम्ही ते दुखावतील असे उत्तर देणार नाही. पण समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झाले, अन्यथा सोलापूरचा निकाल वेगळा असता, असेही त्यांनी सांगितले.