एकीकडं भारत अन् इंग्लंडमधली क्रिकेट मालिका रंगात आलेली असतानाच दुसरीकडं दक्षिण महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही क्रिकेट खेळण्याची जोरदार हुक्की आली. मग काय.. फोना-फोनी झाली. मेसेज फॉरवर्ड झाले. त्यानंतर ठरलेल्या तारखेला सांगली, सातारा अन् कोल्हापूरची प्रमुख नेतेमंडळी कऱ्हाडच्या विमानतळ मैदानावर एकत्र जमली. आता इथंच का तर कऱ्हाड म्हणजे तिन्ही जिल्ह्याचं सेंटर... अन् नाहीतरी हे मैदान आजकाल विमानांऐवजी केवळ म्हशींसाठीच शाबूत राहिलेलं.विद्यमान सभापती अन् माजी क्रिकेटर असल्यानं रामराजेंनी पुढाकार घेतला. सर्वप्रथम सर्वांना शिस्तीत रांगेत उभं केलं. मग ‘हात, कमळ अन् घड्याळ’ अशा तीन पक्षांच्या तीन टीम्स् तयार करण्याची सूचना केली. तेव्हा, साडूचं वर्चस्व कधीच मान्य नसणाऱ्या पृथ्वीराजबाबांनी उदयनराजेंच्या कानात पिलू सोडलं, ‘चौथी टीम धनुष्यवाल्यांची का नको? उचकवा त्यांना फलटणकरांच्या विरोधात!’...नेहमीप्रमाणे मीडियासाठी फोटो शूटमध्येच गुंतलेल्या क्षीरसागरांच्या कानावर हे वाक्य पडताच ते भानावर आले. त्यांनी बानुगडे-पाटलांना टीमसाठी खुणावलं. तेव्हा कधी डावीकडं तर कधी उजवीकडं पळणाऱ्या ‘इंजिन’वाल्यांनाही खाडकन् जाग आली. मोझरांनीही आपल्या साऱ्या मावळ्यांना गोळा केलं.‘घड्याळ’वालेही आपली टीम बनवू लागले. इस्लामपूरच्या जयंतरावांनी आपल्या पाठीमागची संख्या मोजली. पण, हाय.. विधानपरिषदेतल्या पेट्या उचलून-उचलून दमलेली बरीच मंडळी मैदानात उतरायलाच तयार नव्हती. तेव्हा त्यांनी ‘आपल्या दोन्ही टीम मिळून एकच बनवू या!’ असा प्रस्ताव पतंगरावांसमोर ठेवला; तेव्हा मोहनशेठनी घाईघाईनं जयंतरावांच्याच भाषेत जशास तसं उत्तर दिलं, ‘जिसकी ताकद बडी.. उसकी खुदकी टीम!’तिकडं ‘बंटी’ही आपली टीम तयार करू लागले. मात्र, आपले बहुतांश तगडे खेळाडूू अगोदरच ‘भगवी टोपी’ घालून चंद्रकांतदादांच्या घोळक्यात घुसल्याचं त्यांना दिसून आलं. ते पृथ्वीराजबाबांच्या कानात टेन्शनमध्ये कुजबुजले, ‘बाबाऽऽ आपली निम्मी टीम गेल्या अडीच वर्षांत फुटलीय. प्रसंग बाका आहे.’ मात्र, बाबांनी तर शांतपणे त्यापुढचा बॉम्ब टाकला, ‘माझ्याकडची टीम तर अडीच वर्षांपूर्वीच गायब झालीय.’ हे सांगत असताना त्यांची नजर कऱ्हाडचे अतुलबाबा, निमसोडचे रणजितभैय्या अन् महाबळेश्वरचे बावळेकर यांच्यावर भिरभिरत होती.तिसरीकडं चंद्रकांतदादांनी टाळी वाजवताच तिन्ही जिल्ह्यांतील कैक मंडळी पटापटा त्यांच्या जवळ गोळा झाली. बापरेऽऽ बाप.. संख्या मोजता-मोजता दादांच्या नाकीनऊ आलं. (‘बांधकाम’चे अधिकारीही म्हणे जुन्या नोटा मोजताना एवढे कधी दमले नव्हते.) ..पण या साऱ्या भाऊगर्दीत त्यांना एकही ओरिजनल ‘खाकी पॅन्ट’वाला दिसून आलाच नाही, ही गोष्ट अलहिदा! दरम्यान, आपली टीम न्याहाळताना दादांना म्हाडकांची अनुपस्थिती जाणवली. तेव्हा दूरवर उभारलेल्या महादेवरावांकडं दादा स्वत: चालत गेले. त्यांच्या तोंडात तिळगूळ ठेवत टीममध्ये सामील व्हायची विनंतीही केली. खाल्ल्या तिळाला महादेवराव जागले. मात्र, अस्सल गूळ स्वत:कडंच ठेवून घेतला... कारण घरातल्या तमाम नेतेमंडळींना समोर उभं करून त्यांनी आॅर्डर दिली, ‘होशियारऽऽ आधे उधर जाव. आधे इधर जाव. बाकी सब मेरे पिछे आव!’ मग काय सांगावं.. ‘मुन्ना’ घड्याळवाल्यांच्या टीममध्ये शिरले. ‘अमल’ चंद्रकांतदादांच्या घोळक्यात घुसले. बाकीचे त्यांच्यासोबत राहिले. तेव्हा यातल्या कुणाच्या हातात ‘धनुष्य’ द्यावा अन् कुणाच्या हातात ‘इंजिन’.. याचा विचार करीत महादेवराव पुन्हा कोपऱ्यात उभे राहिले.दरम्यान, आपली टीम पूर्ण होणार नाही, हे ओळखून मिणचेकरांनी घोषणा केली, ‘आम्ही कमळवाल्यांच्या वाऱ्यालाही उभारणार नाही. आम्हाला बासऽऽ टॅम्प्लिजऽऽ.’ हे पाहून ‘इंजिन’वाल्यांनीही प्रेक्षागृहातच बसण्याचा निर्णय घेतला. तेव्हा, चंद्रकांतदादांनी ‘हर्डल’ करत आपल्या टीमच्या कानात सांगितलं, ‘हात अन् घड्याळवाल्यांना अगोदर खेळू द्या. भांडू द्या. पळू द्या. ते दोघे दमल्यावर मग आपण मैदानात उतरू.’ एवढ्यात ही टी-२० मॅच सुरू झाल्याची शिट्टी वाजली गेली. ‘दूध’वाले कोरे अन् ‘ऊस’वाले शेट्टी पंच म्हणून मैदानात आले. ‘प्रतीक’नं ‘विशाल’कडून ‘बंदा’ घेऊन टॉस उडविला. जिंकला. ‘हात’वाल्यांनी प्रथम बॅटिंग घेतली. ‘मुन्ना’च्या बॉलिंगवर ‘बंटी’नी चवताळूून बॅटिंग केली. ‘शेखरभाऊ’च्या गुगलीवर जयकुमारांनीही दोन-चार षट्कार ठोकले. मात्र, एक चेंडू टाकताना ‘शेखरभाऊं’नी हळूच खिशातला मोबाईल दाखविला. लक्ष विचलित झाल्यानं ‘जयाभाव’ क्लीन-बोल्ड झाले. खरंतर, ही आयडिया आनंदरावांचीच होती, हे नंतर समजलं. असो. वीस षटकांत ‘हात’वाल्यांच्या दीडशे धावा झाल्या... आता पाळी ‘घड्याळ’वाल्यांची आली. ‘हसनराव’ बॅट घेऊन स्वत: मैदानात ओपनिंगला उतरले. (मात्र पळण्यासाठी त्यांनी स्वतंत्र रनर ठेवला, हे सांगण्याची गरज नव्हती.) सोबतीला मुन्ना, जयंतराव, शशिकांत अन् मकरंदआबा होतेच. त्यामुळं, पाहता-पाहता पाच विकेटस्मध्ये या टीमची सेन्च्युरी पूर्ण झाली. विशेष म्हणजे, प्रेक्षकांमध्ये बसलेले चंद्रकांतदादा ‘घड्याळ’वाल्यांनाच दाद देत होते. हे पाहून सरकलेल्या शेट्टींनी ‘हात’वाल्यांना गुपचूप कानमंत्र दिला. ‘घड्याळ’वाल्यांचे सारे विकपॉर्इंटस् बॉलर्सच्या कानात सांगितले. त्यामुळं धावसंख्या एकशे अठ्ठेचाळीसला पोहोचेपर्यंत आठ गडी बाद झाले. षटके मात्र तब्बल दोन शिल्लक होती. नंतर शेखरभाऊ आले. तेही मोहनशेठच्या चेंडूवर एकच रन काढून तंबूत परतले. शेवटचा बॅटस्मन म्हणून शेवटी उदयनराजे आले. खरंतर, नाइलाजानं त्यांना टीममध्ये घेतलेलं. रामराजेंनी मुद्दामहून त्यांना शेवटच्या फळीतच ठेवलेलं.आता शिल्लक चेंडू अकरा होते.. अन् धावा काढायच्या होत्या फक्त दोन. मॅच ‘घड्याळ’वालेच जिंकणार, हे स्पष्टपणे दिसत होतं. योगायोग म्हणजे उदयनराजेंना साथ द्यायला समोर पीचवर शिवेंद्रराजेच होते. मोहनशेठनी डोळा मिचकावत चेंडू टाकला. उदयनराजेंनीही गालातल्या गालात हसत चेंडू फटकावला. बाबाराजे पळत इकडं आले, पण उदयनराजे जागचे हललेच नाही. मग, जयकुमारांनीही संधी साधून बाबाराजेंना ‘धावचीत’ केलं. ध्यानीमनी नसताना ‘हात’वाले जिंकले. ‘घड्याळ’वाले या धक्क्यातून बाहेर आलेच नाहीत. उदयनराजे मात्र ‘बाबाराजेंना मी कसं आऊट केलं ?’ या आविर्भावात कॉलर टाईट करीत मैदानभर फिरले..पण आपल्या या खेळीमुळं आपण आपल्याच टीमची दाणादाण उडवलीय, हे त्यांच्या गावीही नव्हतं... इति क्रिकेट पुराण समाप्त ! - - सचिन जवळकोटे
नेत्यांची गुगली..चेंडूची चुगली
By admin | Published: January 28, 2017 11:19 PM