पुणे : पांरपरिक कामांमध्ये व्यावसायिकता निर्माण करण्याचे सामर्थ्य राजकारण्यांमध्ये असावे लागते. पारंपरिकतेला व्यावसायिक रुप न दिल्याने आपले खूप नुकसान होते. हे काम करण्याची ऊर्जा आम्हाला समाजातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांकडून मिळते. त्यामुळे ‘लोकमत’च्या प्रोफेशनल आयकॉन्ससारखी कॉफीटेबल बुक समाजासाठी उपयोगी असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथे केले. या बुकच्या माध्यमातून तरूणांनाही व्यावसायिकेची नवीन ऊर्जा मिळेल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.‘लोकमत’च्या ‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन रविवारी हॉटेल जे. डब्ल्यु. मॅरिअट येथे रावते यांच्या हस्ते झाले. खा. अमर साबळे, श्रीरंग बारणे, संजय काकडे व प्रा. रविंद्र गायकवाड, प्रसिद्ध सर्जन डॉ. मुफझल लाकडावाला आणि आर. डी. देशपांडे होल्डिंग्जचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे उपस्थित होते. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते.पिंपरी चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या व्यावसायिकांची यशोगाथा ‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’ या कॉफीटेबल बुकमधून उलगडण्यात आली आहे. प्रकाशन सोहळ््यामध्ये या ‘आयकॉन्स’च्या कर्तृत्वाला सलाम करीत त्यांना सन्मानित करण्यात आले. पारंपरिक कामांना व्यावसायिकतेची जोड देण्याविषयी स्पष्ट करताना रावते म्हणाले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी.चे अडीच लाख टायर रिमोल्ड होतात. त्यापासून इतर वाहनांसाठी टायर तयार केले जातात. हा उद्योग एसटीनेच उभा केला पाहिजे. आपल्याकडे कच्चा माल आहे, जमीन आहे. एखाद्या उद्योजकाच्या मदतीने हा उद्योग उभा राहिला तर अनेक रोजगार निर्माण होतील. ही प्रेरणा, सामर्थ्य व्यावसायिकांकडूनच मिळते. त्यांच्यात वावरत असताना, त्यांच्याकडील नवनवीन संकल्पना पाहताना राजकारण्यांमध्ये व्यावसायिकता निर्माण करण्याची ताकद निर्माण होते.रस्त्यावरच्या सर्व वाहनांना व वाहनचालकांना संरक्षण देण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. ही जबाबदारी पेलताना लक्षात आले की, अनेक वाहन चालक प्रशिक्षित नसतात. दिवसाला किमान एक हजार चालकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. हे प्रशिक्षण सातत्याने एक-दीड वर्षांनी हवे. जग बदलत असून वाहनांमध्येही नाविण्य येत आहे. वाहतुकीची परिस्थिती, नियम बदलत आहेत. त्यामुळे असे प्रशिक्षण गरजेचे आहे. ही संकल्प, कल्पना व्यावसायिकांसमोर मांडताना मला आनंद होत आहे. त्यांच्यामुळे जी ऊर्जा निर्माण होते, त्यातून अशा संकल्पना निर्माण होतात, असे रावते यांनी नमूद केले.आर. डी. देशपांडे होल्डिंग्ज यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केला असून आॅडी उद्योगसमूह सहप्रायोजक होते. (प्रतिनिधी)‘लोकमत’ सर्वसामान्यांचे वृत्तपत्र-‘लोकमत’ सर्वसामान्यांचे वृत्तपत्र आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील प्रत्येक घरात ‘लोकमत’ असतो. समाजसुधारणेच्या बाबतीत समाज ‘लोकमत’कडे आतुरतेने पाहत असतो. समाजाला मार्गदर्शन करणे, उद्योगशील बनविण्यासाठी, आजचा तरूणही उद्योजक झाला पाहिजे, यासाठी ‘लोकमत’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘प्रोफेशनल आयकॉन्स’हा त्याचाच एक भाग असल्याचे रावते म्हणाले.तर असतो यशस्वी व्यावसायिकदिवाकर रावते यांनी आठवणींना उजाळा दिला. मी सुद्धा व्यावसायिक होतो. तत्त्व पाळणारा व्यावसायिक विचित्र असतो. मी १९७३-७४ मध्ये बांधकाम व्यावसायिक असताना मुंबईत बांधलेल्या पहिल्या टॉवरमध्ये आजही राहत आहे. नगरसेवक झाल्यापासून व्यवसाय बंद केला. कारण नगरसेवकपदी असताना व्यवसायावर त्या पदाची सावली पडते, हे नको म्हणून तत्त्वनिष्ठेसाठी व्यवसाय सोडला. या क्षेत्रात आलो नसतो तर यशस्वी बांधकाम व्यावसायिक झालो असतो, असे रावते यांनी सांगितले.प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विजिगिषू वृत्तीने समाजात आपले स्थान उंचावणाऱ्या मान्यवरांची ही यशोगाथा स्फूर्तीदायक आहे. नव्या आशा, आकांक्षांना तरुणाईच्या उमेदीतूनच धुमारे फुटत असतात. या तरुणाईला दिशा देण्याची, प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ती ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स’ मालिकेतून मिळेल, अशी मला आशा आहे. नाविन्याचा ध्यास घेऊन, मळलेली वाट सोडून वाटचाल करण्यासाठी इतरांना प्रेरणा मिळावी हाच या कॉफीटेबल बुकचा उद्देश आहे. - विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया प्रा. लि. लोकांमध्ये नवचैतन्य आणणारा आणि त्यांचा हुरूप वाढविणारा हा उपक्रम आहे. त्यामुळे आणखी भरीव काम करण्यासाठी उत्साह वाढत असतो. लोकांचे मत प्रत्यक्षात आणणाऱ्या ‘लोकमत’ वृत्तपत्राने नेहमीच अशा उपक्रमांतून तरूणांना प्रेरणा दिली आहे. - संजय काकडे, खासदारजे डॉक्टर पडद्यामागे होते, त्यांना पुढे आणण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून ही चांगली सुरूवात करण्यात आली आहे. जे डॉक्टर अद्याप मागे आहेत, त्यांनाही यामाध्यमातून प्रेरणा मिळेल.- डॉ. मुफझल लकडावाला, प्रसिद्ध सर्जन
नेत्यांमध्ये व्यावसायिकता निर्मितीचे सामर्थ्य यावे
By admin | Published: March 20, 2017 3:19 AM