मुंबई – कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ३ जानेवारीला देशात ३५ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय त्यात आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.
मागील २४ तासांत शिवसेनेच्या ३ बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांच्यानंतर आता युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेता नुकतेच युवासेनेचे येत्या ८ व ९ जानेवारीला होणारे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित केल्याची माहिती वरुण सरदेसाईंनी दिली होती. वरुण सरदेसाई हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी अशी विनंती करत काळजी घ्या असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, आमदार रोहित पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती.