भाजप प्रवेश लांबल्याने परतीचे दोर कापणाऱ्या नेत्यांना धाकधूक !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 03:56 PM2019-09-21T15:56:36+5:302019-09-21T15:57:45+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षतील नेते सैरभैर झाले. राष्ट्रवादीतील 20 हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जाणे पसंत केले.
मुंबई - विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक विद्यमान आमदारांनी पक्षांतर केले आहे. तर काही नेत्यांनी पक्षांतराची तयारी केली आहे. मात्र अनेक दिवसांपासून पक्षांतराच्या तयारीत असलेल्या नेत्यांना प्रवेशासाठी ग्रीन सिगनल मिळालेले नाही. त्यातच आता आचारसंहिता लागू झाली असून पक्षांतरचं काय, याची चिंता या नेत्यांना सतावत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षतील नेते सैरभैर झाले. राष्ट्रवादीतील 20 हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जाणे पसंत केले. तर काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार छत्रपती उदनयराजे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून सत्ताधारी भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची एकच गर्दी झाली. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाजपकडून काही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला गेला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि काँग्रेसचे भारत भालके यांच्यासह सिद्धराम म्हेत्रे या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना आणि इच्छूकांच्या मुलाखतीला देखील दांडी मारली होती. त्यामुळे आपल्या पक्षात परतणे या नेत्यांसाठी कठिण आहे. तर रामराजे निंबाळकर यांनी वेळीच सावध भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले आहे.
दरम्यान स्वपक्षाचे दोर कापणाऱ्या या नेत्यांना आचारसंहिता लागू झाली तरी भाजप प्रवेशासाठी सिग्नल मिळालेले नाही. तर स्वत:च्या पक्षात परतणेही कठिण झाले आहे. अशा स्थितीत पुढं काय याची धडकी पक्षांतराच्या प्रयत्नात असलेल्या या नेत्यांना भरली आहे.