माझे आणि बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांचे मतभेद कधीच नव्हते. त्यांची काही आदराची, निष्ठेची स्थाने होती. त्या स्थानांना कोणी धक्का लावण्याचे काम केले, तर त्यांना ते सहन होत नव्हते. ते काम मी केले होते. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये मतभेद झाले आणि यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व आम्ही मान्य केले होते. आणीबाणीला आधी पाठिंबा दिला होता. ही आमची आयुष्यातील चूक आहे. हे आम्ही कबूल केले. त्या कालखंडामध्ये इंदिराजींच्या विरोधात उभा राहिलो होतो. हे जवाहरलाल दर्डांना आवडले नाही. त्यांच्या निष्ठा इंदिरांच्या बाबतीत अबाधित होत्या. त्यांच्या काँग्रेसच्या संकल्पनेच्या ज्या भूमिका होत्या, त्या अतिशय वेगळ्या होत्या. वैयक्तिक मतभेद नव्हते; पण इंदिरा गांधी या विषयासंबंधी तडजोड करायची नाही, ही त्यांची भूमिका होती. एखाद्याची श्रद्धा असावी आणि त्याच्याशी तुम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये, अशी त्यांची गांधी कुटुंबीयांबाबत श्रद्धा होती. राज्याच्या विकासात मंत्रिमंडळात आम्ही एकत्रित काम केले आहे. विद्युतनिर्मिती हा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. त्यासाठी खूप गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक करण्यासाठी बाबूजींचा आग्रह होता. माझ्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी विद्युतनिर्मितीसाठी एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त निधी देण्यास विरोध केला हे त्यांना पटत नव्हते. या प्रश्नावरून थोडी कुरबुर व्हायची; पण माझ्या दृष्टीने उद्या या राज्याचा विकास कसा होईल, याची जाण असलेले जे सहकारी होते, त्यांत जवाहरलाल दर्डा होते. ही भूमिका मांडण्याबाबतीत ते कधीही मागेपुढे पाहत नसत. विकासामध्ये राजकारण आणता उपयोगाचे नाही. सातारा किंवा पुणे जिल्ह्यात विकासाच्या कामात कोणी आडवे येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून पाणी खेळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरडोई शेती तीन एकरांच्या आत आहे. विदर्भात हे प्रमाण १४ ते १५ एकरांच्या आसपास आहे. कमी जमीन असली, की प्रपंचासाठी माणूस जास्त धडपड करतो. विदर्भात जमीन जास्त आहे. पूर्वी पाऊस चांगला व्हायचा. ज्वारी चांगली व्हायची. माणूस दिलदार आहे. आप्तांना मनापासून मदत करण्याची प्रवृत्ती आहे. कर्जाचा बोजा किती वाढला, हे पाहण्याची प्रवृत्ती नाही, ही स्थिती आहे.
जवाहरलाल दर्डा विकासाची जाण असणारे नेते
By admin | Published: December 25, 2015 3:43 AM