- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मुंबईत संप मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी नाशिकमधील बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आहे. नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील नैताळे येथे शेतकऱ्यांनी बटाट्याच्या वाहनाला लक्ष्य केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. प्रशासनाने संपाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्तात शेतमालाचे १९८ मालट्रक जिल्ह्यातून बाहेरगावी रवाना केल्याचा दावा केला आहे. नाशिक बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शिष्टाई करण्यास गेलेले भाजपाचे खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे यांच्याशी चर्चा न करता शेतकऱ्यांनी त्यांना माघारी पाठविले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्ह्यातील बाजार समित्यांची कार्यालये सुरू असली तरी, व्यवहार मात्र झाले नाहीत. कळवणला पोलीस बंदोबस्तात शेतमाल पाठविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असता तेथील व्यापाऱ्यांनी असहकार दर्शविला. पुणतांब्याचे शेतकरी संपावर ठामपुणतांबा (जि. अहमदनगर) : मुंबईत परस्पर संप मागे घेण्याचा निर्णय घेऊन किसान क्रांती समितीच्या सुकाणू समितीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोप करीत शनिवारी पुणतांबा ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत समितीचा धिक्कार केला. शेतकऱ्याचा सातबारा कोरा न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. किसान क्रांतीचा संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे, असे शनिवारी अभय चव्हाण, प्रमोद चौधरी, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, अरूण बोरबणे, विठ्ठल शेळके, प्रशांत काळवाघे आदींनी म्हटले आहे.किसान सभेची नाराजी; नवले बाहेर पडलेमुंबई : मुख्यमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संप मागे घेण्यास आपली सहमती नसल्याचे सांगत किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले हे रात्री ३ च्या सुमारास ‘वर्षा’वरून बाहेर पडले. चर्चेला सुरुवात होताना ते अन्य शेतकरी नेत्यांसोबत होते.सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा ही संपाची मागणी होती. या दोन्ही मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. शेतकऱ्यांना पेन्शन देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुधाच्या भाववाढीचे गाजरही बेभरवशाचे आहे. असे असताना संप मागे घेऊ नका असे आपण वारंवार शिष्टमंडळातील सदस्यांना सांगत होतो, असे नवले यांनी सांगितले.