"रोखठोक भूमिका घेणारे नेतृत्व सहकाऱ्यांची बाजू घेताना अडखळत...", रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 03:32 PM2023-12-09T15:32:01+5:302023-12-09T15:33:52+5:30

रोहित पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता ते स्वतःच्याच सहकाऱ्यांची बाजू घेताना कसे अडखळत आहेत, असे म्हटले आहे. 

"Leaderships that take firm stances stumble while siding with colleagues...", Rohit Pawar's taunt to Ajit Pawar | "रोखठोक भूमिका घेणारे नेतृत्व सहकाऱ्यांची बाजू घेताना अडखळत...", रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

"रोखठोक भूमिका घेणारे नेतृत्व सहकाऱ्यांची बाजू घेताना अडखळत...", रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

नवाब मलिक... यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक आपल्यासोबत नको असे पत्रही अजित पवारांना लिहिले आहे. या पत्रातून नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य नसल्याचे म्हटले. या सगळ्याभोवती राज्यात राजकीय घमासान पाहायला मिळते. अशात आता रोहित पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता ते स्वतःच्याच सहकाऱ्यांची बाजू घेताना कसे अडखळत आहेत, असे म्हटले आहे. 

यासंदर्भात रोहित पवारांची एक्सवर एक सूचक पोस्ट केली आहे. "प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटतं. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडतं. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला लोकनेता भाजपच्या रणनीतीचा शिकार होत आहे, याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे", असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी विधिमंडळात नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या बाजूला बसले. यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना अजित पवार गटात सहभागी करून घेण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी रीतसर पत्र लिहून नवाब मलिकांच्या सरकारमधील समावेशाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावरून भाजप व अजित पवार गट या दोन सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे यावरून तर्कवितर्कांना उधाण आलेले असताना अजित पवारांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना नवाब मलिकांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे सांगितले आहे.

Web Title: "Leaderships that take firm stances stumble while siding with colleagues...", Rohit Pawar's taunt to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.