लोकसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांना सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:25 AM2019-02-15T06:25:10+5:302019-02-15T06:25:34+5:30
लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ४२ जागा लढवणार असून उर्वरित सहा जागा घटकपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. यात स्वाभिमानी, भारिपसह माकप, रिपाइं कवाडे गट आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा समावेश असणार आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगले, माढा, वर्धा आणि बुलडाणा अशा चार जागांची मागणी केली होती. मात्र, हातकणंगलेच्या जोडीने आणखी एखादी जागा सोडण्याची आघाडीची तयारी असल्याचे समजते. तर, प्रकाश आंबेडकर यांच्याशी येत्या आठवडाभरात चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आघाडीतील जागावाटपाबाबत अद्याप कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. जागांच्या अदलाबदलीसह सर्व मुद्द्यांवर तोडगा निघाला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आंबेडकरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी बैठकीनंतर सांगितले. जागावाटप नक्की झाले असले तरी घटकपक्षांशी चर्चा केल्यानंतरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या भेटीबाबत पक्षातील अन्य नेत्यांना अवगत केले आहे. मनसे आणि राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण झाल्यानंतर याबाबत काँग्रेसशी बोलणी करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘पवार लढल्यास अन्यत्रही मिळेल फायदा’
शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच नेत्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे आजूबाजूच्या मतदारसंघांवर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.