मुंबई : लोकशाही आघाडी सरकारने १५ वर्षांमध्ये केलेल्या अनेक विकासकामांमुळे मतदार पुन्हा एकदा आघाडीलाच संधी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक जाहीर होताच व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीची सन्मानाने आघाडी होईल, असे ते म्हणाले. निवडणूक आचारसंहिता लागू होताच घेतलेल्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मिळालेले यश, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतदानाची टक्केवारी, २००९मध्ये कोणी किती जागा लढविल्या, १९९९मध्ये आम्ही वेगळे लढलो तेव्हाची स्थिती अशा सगळ्या निकषांचा आधार आघाडीचा फॉर्म्यूला ठरविताना घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत लोकहिताचे घेतलेल्या अनेक निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आता पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम करण्याचे आणि जनतेचे जीवन अधिक सुखकर करण्याचे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी जनतेचा कौल आघाडीला हवा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेची निवडणूक लढणार का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्याबाबतची भूमिका आपण काँग्रेस श्रेष्ठींकडे कळविली आहे. श्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील. (विशेष प्रतिनिधी)
आघाडी पक्की, सरकार नक्की
By admin | Published: September 13, 2014 4:53 AM