मुंबई - अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता माजी पंतप्रधान अटलविहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे. किमान वाजपेयींचे स्मारक तरी पूर्ण होणार का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरूवात करताना मुंडे यांनी सरकारवर टीका केली. दोन वर्षांत दीड लाख रिक्त पदे भरण्याची घोषणा झाली. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या ७२ हजार पदांच्या मेगाभरतीपैकी किती पदे भरण्यात आली याची माहिती सरकारने द्यावी. नुसत्या पोकळ घोषणा करून सरकार बेरोजगारांची फसवणूक करीत आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या संकटात असताना, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा दिला असता तर बरे वाटले असते. परंतु तसे न करता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री रथयात्रा काढणार आहेत. तुम्ही स्वत:ला राजे समजता का, असा सवालही मुंडे यांनी केला.राज्यावर चार लाख १४ हजार ४०० कोटींचे कर्ज आहे. गुजरातवर ३२ हजार ४१३ कोटी, उत्तर प्रदेशावर ६२ हजार ९८० कोटी, कर्नाटकावर २७ हजार ६८४ तर मध्य प्रदेशावर ३२ हजार ३६५ रूपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्रावर इतके कर्ज का वाढले याचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे. याचा लौकिक घालवू नका. वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना पक्षात घेऊ नका. अडचणीत आणतील, असा इशारा शेकापचे जयंत पाटील यांनी दिला.
किमान वाजपेयींचे तरी स्मारक पूर्ण करा - मुंडे यांचा सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 6:46 AM