लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये ३.५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी सोडण्याचा निर्णय आज उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हे पाणी सोडताना थकबाकीदार परवानाधारकांकडून तातडीने थकबाकी वसुल करण्यात यावी. सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ फक्त परवानाधारक शेतकरीच घेतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच नदीपात्रात बेकायदेशीर वीजपंप लावून पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश रावते यांनी दिले. सिना कोळेगाव प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीस बीड लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, भूमच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. म. जगताप, परंड्याचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवकते, दीपक सरतापे आदी उपस्थित होते.सीना कोळेगाव प्रकल्पात ११ मे २०१७ रोजी एकूण ७७.१२ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा २.८२ दलघमी तर मृत पाणीसाठा हा ७४.३० दलघमी इतका आहे,सिना कोळेगाव धरणातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये उर्वरीत उन्हाळी हंगामासाठी ३.५० दलघमी पाणी सोडण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यानुसार मान्यता देण्यात आली.धरणातून पाणी सोडल्यानंतर परीसरातील विहीरींची पाणीपातळी वाढणार आहे. या विहीरींचा परिसरातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वापर करण्यात यावा. परिसरात टँकर सुरु असल्यास ते भरण्यासाठी या विहीरींचा वापर करण्यात यावा. यासाठी जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्रांत अधिकारी यांनी आदेश काढून कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या बोअरवेलचे श्रमदानातून पुनर्भरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सीना कोळेगाव प्रकल्पातून ३.५ दलघमी पाणी सोडणार
By admin | Published: May 16, 2017 2:26 AM