अकोला- पाकव्याप्त काश्मिरला मदत देणार्या पंतप्रधान मोदींनी विदर्भातील शेतकर्यांना काय दिले? येथील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. त्याला मोदी मदत करतील काय? येथील शेतकर्यांसाठी कर्जमाफी नव्हे तर संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा मोदींनी करावी, असे आवाहन करून, मोदी हे भाजपचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहे, हे त्यांनी विसरू नये, असा टोला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लगावला. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या जाहीर सभांमध्ये ठाकरे यांनी प्रथमच थेट मोदी यांचे नाव घेऊन टिकास्त्र सोडले. अकोल्यातील राधादेवी गोयनका महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ह्यअच्छे दिनह्ण देण्याचे आश्वासन देणार्या भाजपने शेतकर्यांसाठी काहीच केले नाही. दुष्काळाच्या झळा महाराष्ट्राला बसत असताना, केंद्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. महाराष्ट्राला वार्यावर सोडले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टीका केली. राज्यात १५ वर्षे सत्ता भोगणार्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जनसामान्यांसाठी कोणत्या योजनांची घोषणा केली? काँग्रेसच्या ह्यअँडव्हॉन्टेज विदर्भह्णने विदर्भाला काय दिले, असा सवाल त्यांनी केला. बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही, सिंचनाच्या सुविधाही विदर्भाला मिळाल्या नाहीत. आता त्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांवर टिका करीत आहेत. सोबती नालायक होता, हे माहिती होते, तर खुर्चीला खुर्ची लावून १५ वर्षे सत्ता कशी उपभोगली, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान, शिवसेनेच्या हाती राज्याची सत्ता द्या, रेल्वे अर्थसंकल्पाच्या धर्तीवर शेतीसाठीही स्वतंत्र अर्थसंकल्प देऊ, असे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील सभेत दिले. राज्यातील बहुतांश नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे; मात्र आतापर्यंत शेतकर्यांचे कैवारी म्हणविणार्यांनीच सत्तेत असूनही शेतकर्यांवर अन्यायच केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
शेतक-यांना वा-यावर सोडले
By admin | Published: October 05, 2014 2:30 AM