हिंगोली - उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू इथं कुणाचे राज्य आले याचा विचार ओबीसी समाजानं केला पाहिजे. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर आज मुख्यमंत्री म्हणून इथं आला असता असा एल्गार महादेव जानकरांनी हिंगोलीच्या सभेत केला.
महादेव जानकर म्हणाले की, आमच्या चूका झाल्या आहेत. आता कुणाला वाईट आणि शिव्या देण्यात वेळ घालवू नका. तुम्ही नेते आहात शासन बनू शकता. आम्हाला महात्मा फुलेंचा वारसा आहे.मी नुकतेच अमेरिकेला गेलो होतो. तिथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहून मी १ तास भर थांबलो. अशा महापुरुषांचे वारसदार असलेली आपण आहोत. १०० जर आपण ८५ आहोत तर छोट्या लोकांना मला आमदार, खासदार करा अशी तिकीट मागायला कशाला जायचं असा सवाल त्यांनी केला.
तसेच आपण मागणारे नाही तर देणारे झालो पाहिजे. आपल्याला छोटीमोठी सत्ता नको. कुठल्या धर्मावर आणि जातीवर टीका करण्यापेक्षा ओबीसींनी ठरवा. ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिकेचा नगरसेवक, नगराध्यक्ष होणार नाही, झालो तर आमदार, खासदारच होऊ. झेंडा धरायला तुम्हाला माणसे मिळणार नाहीत. भुजबळांपेक्षा मी लहान आहे. माझ्या पक्षाला ६ राज्यात मान्यता मिळाली. ६ आमदार पक्षाचे आहेत. ९२ जिल्हा परिषद आहेत. उत्तर प्रदेशात मुलायम यांनी पक्ष काढला, अखिलेश मुख्यमंत्री झाला, कांशीराम यांनी पक्ष काढला तेव्हा आपली चर्मकार भगिनी मायावती मुख्यमंत्री झाली. आज जे पक्ष आहेत. महाराष्ट्र कोण चालवतंय? कुणाच्या मागे आपण जातोय त्यामुळे डिमांडर नको तर कमांडर बना अशी विनंती महादेव जानकरांनी छगन भुजबळांना केली.
दरम्यान, मंत्री होऊ अगर न होवो, तुम्ही चॅलेंज देत असाल तर आम्हीही चॅलेंज देऊ. आम्हाला मिळमिळी नको, ज्याला यायचा आहे तो आमच्यासोबत येईल. पुण्याचे हडपसर याच होळकरांनी जाळले त्यांची औलाद आम्ही आहोत. आम्हाला नडणार तर आम्हीही नडू. आम्हाला सर्वच पाहिजे. दलित आणि मुस्लिमांनाही आवाहन करा, त्यांनाही सोबत घ्या, समाजकारण बाजूला ठेवा, राजकारणी बना तरच तुमचे प्रश्न सुटतील नाहीतर भिकाऱ्यासारखे मागत बसावे लागेल. आम्ही पक्ष काढलाय, तुमच्यासोबत युती करायला तयार आहे. जी जागा म्हणाल ती सोडू पण तुम्ही पक्ष काढा. आम्हाला बुद्धीने राजकारण खेळावे लागेल. समता युग आणावे लागेल. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ एकत्र आले असते तर ही वेळ आज आपल्यावर आली नसती.मतांच्या दृष्टीने तुम्ही सगळे ओबीसी एकत्र या असं आवाहन महादेव जानकर यांनी केले.