दापोली : भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे सध्या मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याचबरोबर, ज्यावेळी शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. त्यावेळी काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.
शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रामदास कदम बोलत होते. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. आम्हाला महायुती टिकवायची आहे. गद्दारांची व्याख्या अनेकांना कळली नाही. उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कुणी चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. गद्दारांना सोबत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं रामदास कदम म्हणाले.
याचबरोबर, ज्यावेळी सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो, हे शंभर टक्के खरं आहे. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटलं की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. सगळ्या आमदारांना दोन तासात 'मातोश्री'वर नाही आणलं, तर माझं नाव रामदास कदम नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी माझं ऐकलं नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचं ऐकलं आणि ते काँग्रेससोबत राहिले, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याशिवाय, शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार असल्याचेही यावेळी रामदास कदम यांनी सांगितलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी भाजपवर तोंडसुख घेतल्यामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. मात्र, या दापोलीत कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. त्यावेळी चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा टोला रामदास कदम यांनी लगावला होता. मुंबई-गोवा महामार्गाचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. तर, यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाणांनीही कदमांना अडाणी असं संबोधलं होतं. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रवींद्र चव्हाण यांनी दिला होता.