नवी मुंबई : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ३८० मनपसंत गृहप्रकल्पाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. खारघर व उलवे येथील गृहप्रकल्पांतील शिल्लक सदनिकांसाठी ही सोडत काढण्यात आली होती. उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांसाठी या योजनेमध्ये घरे उपलब्ध केली होती. सिडको भवनमधील सभागृहात सिडकोचे दक्षता अधिकारी विनय कोरगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, महाव्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान महाजनको अवैस मिर्झा, निवृत्त न्यायधीश चंद्रलाल मेश्राम, सिडकोचे निवृत्त वरिष्ठ विधी अधिकारी पी. सी. जोशी, सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता बी. के. शमी, ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांच्या उपस्थितीत ही सोडत संपन्न झाली. सोडतीसाठी सिडकोच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रमाणीकरण परीक्षक आणि दर्जा प्रमाणपत्र संचालनालयाने प्रमाणित केलेल्या विशेष संगणक प्रणालीच्या माध्यमातून ही सोडत काढण्यात आली. या प्रणालीत मनपसंत योजनेसाठी प्राप्त झालेल्या सर्व ७ हजार ८४ अर्जदारांनी नोंदणी करण्यात आली होती. यशस्वी अर्जदार तसेच प्रतीक्षा यादीतील अर्जदार अशा सर्व याद्या विशेष निमंत्रित पर्यवेक्षकांनी स्वाक्षरी करून सांक्षाकित केल्या असून, सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashatra.gov.in वर सर्वांना पाहता येणार आहेत. (प्रतिनिधी)
सिडकोच्या ‘मनपसंत’ गृहनिर्माण योजनेची सोडत
By admin | Published: March 01, 2017 2:42 AM