ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे. साहित्यनगरी (डोंबिवली), दि. 5 - भाजपा-राष्ट्रवादीच्या जवळिकीची फारशी चर्चा होऊ नये, यासाठी अधिवेशनाला गैरहजर राहणारे शरद पवार, शिवसेना-भाजपातील राजकीय मतभेदांमुळे मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर येणे टाळणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे अशा उद्घाटन सोहळ्यातील राजकीय अनुपस्थितीनंतर आज (रविवारी) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होतो आहे. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेही असतील. मुंबई, ठाण्यासह विविध महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत उद्धव ठाकरे संमेलनाला कसा वेळ देतात आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात कमी पडलेल्या आपल्याच राज्य सरकारचा कसा समाचार घेतात, त्याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मराठी भाषेवर इंग्रजीचे होणारे अतिक्रमण, बंद पडणाऱ्या मराठी शाळा हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय. पण साहित्य संमेलनाचे अध्यश्र डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजीशी जुळवून घ्या, असा सल्ला आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला आहे. या त्रिभाषा सूत्राला ठाकरे पसंती देतात का, तेही पाहणे महत्त्वाचे आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध ते कसा करतात त्याकडे राजकीय मंडळींचे लक्ष आहे. मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी नथुरामी प्रवृत्ती मला गोळ्या घालू शकतात आणि तशा त्या घातल्या तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे विधान मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत केले होते. त्यावर उद्धव काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे आहे. कारण त्यांचेच उपनेते असलेले शरद पोंक्षे सध्या सर्वत्र नथुरामसंदर्भातील नाटकाचे प्रयोग करत आणि व्याख्याने देत आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी वारंवार केली आहे. पण ती प्रत्यक्षात आलेली नाही. त्यामुळे त्यावर ते नव्याने कोणते आश्वासन देतात, हा मराठी भाषाप्रेमींच्या औत्सुक्याचा विषय आहे. शिवाय बंद पडणाऱ्या मराठी भाषा, मराठीशी जोडून असलेल्या अनेक संस्थांची रिक्त असलेली पदे, एकंदर भाषा व्यवहाराला राज्य सरकारचे प्रोत्साहन यावरील त्यांचे भाषण महत्त्वाचे ठरणार आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुण्यात फोडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा निषेध करणारा ठराव साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात करावा, यासाठी मोहीम सुरू आहे. तसेच संमेलनाचे आयोजन करणाऱ्या आगरी युथ फोरमला 27 गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वेगळी करण्याचा ठराव व्हावा असे वाटते. ते ठराव होतात का हे संध्याकाळी पाच वाजता कळेल.