मुंबई : जालना शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यामुळे नगरपालिकेच्या वीजबिलामध्ये ५० टक्के बचत होईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.एलईडी दिवे बसविण्यासंदर्भात जालना नगरपालिकेचा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार झाला. त्या वेळी लोणीकर बोलत होते. याप्रसंगी कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे, जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी आदी उपस्थित होते. या वेळी लोणीकर म्हणाले की, जालना शहरातील मर्क्युरी दिव्यांमुळे नगरपालिकेला १३ कोटींचे वीजदेयक आले होते. हे देयक भरणे शक्य नसल्यामुळे यावर उपाय म्हणून हा करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत जालना शहरातील मर्क्युरी दिव्यांऐवजी खांबांवरती १४५०० एलईडी लाइट लावण्यात येणार आहेत. यामुळे ऊर्जेची ५० टक्के बचत होणार आहे. तसेच या करारानुसार एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड पुढील ७ वर्षे एलईडी दिव्यांची देखभाल दुरुस्ती करणार असून, यामुळे नगरपालिकेच्या खर्चात बचत होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
जालना शहरात एलईडी दिवे - लोणीकर
By admin | Published: May 08, 2016 2:15 AM