लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोल्हापूरजवळील जयसिंगपूर येथे २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या २२व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डोंबिवलीतील प्रथितयश लेखिका लीला शहा यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हा डोंबिवलीकरांचा विशेष सन्मान असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र जैन साहित्य परिषद लक्ष्मीसेन महाराज यांच्यातर्फे जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शहा यांची निवड करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे श्रीधर हिरवडे, डी.ए. पाटील, रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यांनी हा निर्णय शहा यांना कळवला आहे. शहा यांचा जन्म १९३५मध्ये झाला. त्यांची मातृभाषा ही गुजराती असली तरी त्यांच्या सात पिढ्यांचा संपर्क हा मराठीशी आहे. त्यामुळे त्यांचे मराठी भाषेतून विपुल लेखन झाले आहे. शहा यांनी पहिली कविता १९५३मध्ये लिहिली. त्यांनी लिहिलेली अल्बर्ट श्वाईट्झर, राजेंद्र सिंह आणि कविता पर्यावरणाच्या आणि नवं विचाराच्या या पुस्तकांना राज्य सरकारचे साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘प्रकाश यात्रा’ या पुस्तकाला जैन साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्याची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती. १९८३मध्ये त्यांचा खरा साहित्य लेखन प्रवास सुरू झाला. त्यांचे पुस्तक लिहून प्रसिद्ध होण्यास १९८८ साल उजाडले. त्यांनी लिहिलेल्या ‘गीत ज्ञानेश्वर’ या पुस्तकास कुसुमाग्रज यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यांच्या ‘बाईच्या डायऱ्या’ या पुस्तकाच्या २०० प्रति हातोहात खपल्या आहेत. त्याला वाचकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कथा, कविता आणि सांगीतिक शोध निबंध शहा यांनी लिहिले आहेत. जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी सुरेखा शहा व शरयू दप्तरी यांनी भूषवले आहे. त्यांच्यानंतर शहा यांना हा बहुमान मिळालाआहे. जैन साहित्य मराठीतून लिहिणारे चांगले लेखक आहेत. जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांची निवड केल्याबद्दल निवड समितीचे आभार मानले आहेत.
अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीला शहा
By admin | Published: July 08, 2017 3:28 AM